Wednesday, April 21, 2010

बापू

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी गंमतीने म्हणत असत, आगगाडीचा डब्बा हेच माझं घर आहे. सार्वजनिक कार्यासाठी स्चत:च्या देशाची ६०-६५ वेळा अखंड परिक्रमा करणार हे जगातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व असाव.. अशा श्री गुरुजीना विचारल-- आपल्या आरोग्याच रहस्य काय ? तर ते सांगत असत " बस, रोज २५ सूर्यनमस्कार व २-४ आसनं.." बहुधा आमच्या बापूंच्या आरोग्याचही रहस्य हेच असाव.. अगदी अखेरचे काही दिवस अपवाद वगळता बापूंना कधी आजार शिवलाच नाही. ना रक्तदाब, ना मधुमेह, ना पाठदुखी, ना पोटदुखी... व्याधी नाही, आजार नाही, पथ्य नाही कि औषध नाही.. असं मस्त मजेत आनंदात संपूर्ण आयुष्य जगले..लहानपणापासून माझ्या मनात काही क्षणचित्र ठसली आहेत त्यात ठसठशीतपणे आठवत ते सूर्यनमस्कार घालणारे बापू...

वयोमानानुसार त्यांच्या व्यायामाच स्वरूप बदलत गेल ते सकाळी शाखा व सायंकाळच्या पदभ्रमणावर स्थिरावल. सततोद्योग हा त्यांचा स्थायीभाव होता. कधी बागेतल्या झाडांना आळी करायचे, तर कधी घरासमोरचं आंगण मस्त चोपून कढायचे.. कधी बाज विणायला घ्यायचे तर कधी कुंपणावरच्या झाडांची सुरेख ’कटिंग" करायचे. त्यामुळे कुदळ-फावडे, विळा-खुरपे, झाडांना पाणी घालण्यासाठी झारी, तर वाढलेल्या झाडांच्या कटिंग साठी मोठाली कात्री हे सारे त्यांचे रविवार सुटीचे सवंगडी असायचे. त्यामुळे चांदणं पहात झोपाव अस मस्त आंगण आम्हाला लाभल होत. गुलाब, मोगरा, तगर, पारिजात, कृष्णकमळ, सोनटक्का यांचा दरवळ नि दिमाख घराभोवती पसरलेला असायचा तर पेरू, चिकू, जांभळं नि केळी यांची सदा रेलचेल असायची..

जसा सततोद्योग तसाच स्वच्छता, टापटीप व नीटनेटकेपणा हाही त्यांचा स्थायीभाव झालेला होता. कधी त्याबद्दल आदर वाटे तर कधी मनावर दडपण ! कपाटात क्रमवार व सम्यक मध्ये लाऊन ठेवलेली पुस्तकं, एकावर एक रचून ठेवलेले महिन्या दीड महिन्याचे पेपर.. असं वाटावं जणू आजच्याच ताज्या अंकाच्या पाच-पन्नास प्रती कुणी आणून ठेवल्या आहेत..इतका व्यवस्थित गठ्ठा ! एकता, युववाणी, विवेकानंद केंद्र पत्रिका, विवेक, यांचे सारे - पूर्णपणे वाचून झालेले - व नंतर काळजीपूर्वक जतन करून ठेवलेले अंक इथपासून ते किरकोळ रबर, पेन्सिल, टाचणी पर्यंत सारे काही शिस्तीत, नेमक्या जागेवर.. ! बापू कधी पुण्याला गेलेले असतील तर इथून फोन करून विचारावं, बापू पोस्टाचं तिकिट आपल्याकडे आहे का ?.. अन बपूंनी तिथूनच ते नेमकं कुठे आहे ते सांगावं..
कधी कुठल्या गोष्टीची उधळ-माधळ नाही कि तूट-फूट नाही... हा स्वभाव बनल्यामुळेच बापूंनी जशा वस्तु जमवल्या, जतन केल्या तशीच माणसंही जोडली, नाती जोपासली, वाढवत नेली..बोलक्या स्वभावाची माणसं मित्र-गोतावळा पटकन जमवतात पण, बापूंसारख्या अबोल माणसाने इतका मित्रपरिवार, आप्तजनांची नातीगोती कशी जोपासली असतील हे एक कोडंच वाटत..समोरच्या माणसाचं म्हणणं न कंटाळता शांतपणे ऐकत असत आणि त्यांच्या अभिप्रायाची चेहयावरील एखादी छोटीशी मिश्किल लकेरही समोरच्याच मन जिंकून जात असे..बापूंना जशी वस्तूंची पारख होती तशीच माणसांचीही. त्यामुळे प्रत्येकाची गुणवत्ता जाणणं, त्याच्या सुखदु:खाच्या प्रसंगी समरस होणं यातूनच त्यांनी माणसं जोडली, नाती वाढवली..

लहानपणापसून त्यांनी कधीच आमच्यावर आपली मते लादली नाहीत. शाखेत जावं न जावं, अभ्यासक्रम कुठला निवडावा इथपासून ते माझ्या प्रचारक जाण्यापर्यंत आपआपले निर्णय घेण्याच आम्हाला मुक्त स्वातंत्र्य होत. थोडा आग्रह, थोड स्वातंत्र्य.. शाखेत जायला हरकत नाही, पण साडेआठ च्या ठोक्याला घरात याव आणि अभ्यास करून मगच शाखेत जाव..अशी मार्गदर्शक सूत्र !

पर्यटन, पत्ते, अन चवीने खाणे ( पिणे अजिबात नाही ) हे बापूंचे खास आवडीचे विषय.. कधी पत्ते मंडळाबरोबर, तर कधी ऑफिस मंडळाबरोबर, कधी नातेवाईक मंडळी, तर कधी शाखेतील मंडळी.. बापूंनी भरपूर सहली केल्या, आनंदल्या ! दैनंदिनी द्वारे, छायाचित्रां द्वारे त्या स्मृतिबद्ध करून ठेवल्या..तब्बेत ठणठणीत असल्यामुळे चवीने खायचे, हौसेने खिलवायचे, घरातील डबे सतत भरून ठेवायचे.. ३०-४० वर्षांपूर्वीच्या जमान्यातही कधीतरी मजा म्हणून उपाहारगृहांचा आस्वाद घ्यायला घेऊन जायचे. दर मंगळवारी पुरे-पुरे म्हणेस्तोवर ऊसाचा रस पिण्याचा कार्यक्रम चाले..पत्ते म्हणजे एकदम वीक पॉईंट. त्यांचा ’ब्रिज’ मंडळ परिवार खूपच मोठा होता. परंतु, आमच्या सारख्या पोराटोरां बरोबरही रमी नि झब्बू, बिझिक नि कॅनेस्टर यांच्या मैफ़िली त्यानी रात्र-रात्र जागवल्या होत्या. एकटेच असले तर डाव मांडायचे आणि अलिकडे काळानुरूप संगणकावरही खेळायचे..

आमच्या आई-बापूंच्या सहजीवनाच साठाव वर्ष सुरू होत होतं. बापूंना पंखा ५ वर लागे तर आईला १ वर सुद्धा सोसत नसे. बापूंना जेवताना पानात गोड हवच तर आईला हवा खर्डा वा ठेचा.. असं हे तब्बल साठ वर्षांच सहजीवन.. दुसयाशी जुळवून घेणं, जमवून घेणं, प्रसंगी आपल्या आवडी-निवडी ला प्रत्येकानेच कधीतरी मुरड घालणं याचा कित्ता नकळतपणे एकत्र कुटुंबात गिरवला जातो. अशा तीन पिढ्यांच्या एकत्र कुटुंबात आम्ही वाढलो, समृद्ध झालो. बापूंच्या या कौटुंबिक, प्रापंचिक वाटचालीत म्हणूनच मोठं श्रेय आमच्या आईला सुद्धा जातं. बापू अंधश्रद्ध नव्हते पण सश्रद्ध जरूर होते. दर गुरुवारची आरती व प्रतिदिन पहिल्या चहापूर्वीचे प्रात:स्मरण या, साया कुटुंबियानी एकत्रितपणे करण्याच्या गोष्टी त्यांनी रुजवल्या. तरीही त्याना कर्मकांडाचे स्तोम मात्र मान्य नव्हते. म्हणूनच आपल्या उत्तरक्रिया-विधी संबंधी सुद्धा साधेपणाच्या सुस्पष्ट सूचना त्यानी लिहून ठेवल्या होत्या.

आमच्या ८-९ खोल्यांच्या घरात कुठल्याही गोष्टीची कधी कमतरता पडू दिली नाही, पण केवळ पैशाच्या मागे मात्र ते कधीच लागले नाहीत..वडील आयकर खात्यात आहेत म्हटल्यावर ऐकणारे म्हणायचे - व्वा, मग काय ?... पण आमचे बापू यात कधीच गुंतले नाहीत. उलट देवाच्या दयेने आणि गाळलेल्या घामाने जे मिळवलं ते जमेल तितकं देत रहाण्याचंच वळण होतं. अनेक संस्थाना, सामाजिक प्रकल्पाना दान करत राहिले. आपल्या सूनबाईंच्या कर्तृत्वावर त्यानी प्रथम श्रेणीची मोहर उमटवली होती तर दोन नाती व दोन नातजावई यांचही त्याना कोण कौतुक होत.. चौघांच्या माथ्यांवर मंगलाक्षतांचा वर्षाव करण्याची त्याना ओढ लागली होती, पण काळाची पाऊलंही त्यानी ओळखली होती. म्हणूनच तिकडची हाक आल्यावर अगदी कृतार्थ अंत:करणाने ते पुढील प्रवासास निघाले...व्यावसायिक जीवनातील शुचिता, कौटुंबिक जीवनातील धन्यता आणि सामाजिक कर्तव्याची पूर्तता करत त्यानी पुढील प्रवास सुरू केला.. कालाय तस्मै नम:... ...

1 comment:

  1. खूप छान. अगदी डोळ्यांसमोर सगळं उभं राहीलं अर्थातच त्यात बापूंची मिश्कीलपणे हसणारी प्रतिमा सुध्दा आहेच. मस्तच. पुढच्या पोस्ट ची वाट पहाते.

    ReplyDelete