Wednesday, May 12, 2010

रामभाऊ

१९७७ साली आणिबाणी उठली, निवडणुका झाल्या, प्रथमच केन्द्रात गैरकॉंग्रेसी सरकार आलं. या सार्‍या जनआन्दोलनात रा.स्व.संघाचा सहभाग मोठा होता.. या पार्श्वभूमीवर ७८-७९ च्या आसपास संपूर्ण देशभर एक व्यापक अभियान घेण्यात आलं. गावोगावी जाऊन ग्रामसभा घेऊन लोकांना संघासंबंधी माहिती सांगावी अस त्याच स्वरूप होत.

मी सोलापूर तालुक्यात नुकताच प्रचारक म्हणून दाखल झालो होतो. माझ्याकडेही काही गावे संपर्कासाठी देण्यात आली. असाच एक दिवस सायंकाळच्या मुक्कामी बसने दक्षिण सोलापुर तालुक्याच्या टोकावरील एका गावी निघालो. मुक्कामी गाडी, त्यामुळे गर्दी भरपूर.. रस्ता बेताचाच, धुरळा उडवणारा व खडकाळही.. बस मुक्कामी पोचेपर्यन्त अंग चिंबून गेल होत.. मी मुंबईच्या परिसरात, सुखात वाढलेला.. सारा अनुभव नवखा होता.. गावात संदर्भासाठी कुणाचंच नांव वगैरे हातात नव्हत. एका अनोळखी गावात प्रथमच, एकटाच पाऊल टाकत होतो. बस मुक्कामी असल्याने काहीही झालं तरी सकाळपर्यन्त परत जाण्याचे दोर कापलेलेच होते.

बस मधील प्रवासी पटापटा उतरले अन मार्गस्थ होऊ लागले. चहूकडे मिट्ट अंधार पसरला होता. वीजही पोचलेली नसावी अथवा लपंडाव खेळणारी असावी असं लक्षात आलं. दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते.. एका सहप्रवाशाला धीर करून विचारलं, काहो मामा, गावचे सरपंच कुठे रहातात ?

त्याने त्या दूरवरच्या मिणमिणत्या प्रकाशाकडे बोट दाखवलं आणि मी लगबगीने त्या दिशेने निघालो. दमलो तर होतोच. पोटात भूकही भडकलेली होती. प्रचारकांच्या टिपिकल वेषात, दुटांगी धोतर-झब्बा आणि त्या काळची ती खाकी कॅनव्हासची बॅग अशा रूपात मी सरपंचांच्या घराच्या उंबरठ्यात जाऊन उभा राहिलो.. रॉकेलच्या दिव्याच्या धूसर प्रकाशात आतील काहीच स्पष्ट दिसत नव्हत. इतक्यात आतूनच आवाज आला-- या, या.. मी आत गेलो.. चला, पानं मांडलीच आहेत, तिकडे ओसरीवर पिशवी ठेवा, चौकातील हौदापाशी हात-पाय धुवून घ्या अन चलाच जेवायला..

केवढा मोठ्ठा पराक्रम केल्याच्या, काहीतरी जिंकल्याच्या आनंदाने मी आतल्या आत सुखावलो.. अजून ओळख-पाळख नाही अन एकदम चला जेवायला ? इतका माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ?

पान वाढलं.. जेवण सुरू झालं. मी स्वत:ची माहिती सांगितली, येण्याचं प्रयोजन सांगितलं.. दिवसभरात एकदाच येणारी बस सकाळी परत जात असल्यामुळे, मी म्हंटलं.. ’रात्रीच आपण गावकर्‍याना बोलवू शकाल काय ?’ "...." थोडी शांतता, मग म्हणाले अवश्य बोलवू, आधी पोटभर जेवा तरी..मुक्काम इथेच करणार ना ? मी अधिकच सुखावलो.. भोजन संपलं, हात धुवून आम्ही ओसरी जवळच्याच एका खोलीत आलो. अंधुक प्रकाशात मी खोली न्याहाळू लागलो.. नजर भींतीवर अधिक वर गेली.. तिथे दोन तसबीरी दिसल्या. डॉ. हेडगेवार अन श्रीगुरुजी ! मी चमकलोच.. म्हणालो, पाटील साहेब हे काय ? हे फोटो इथे ?.. .. हो, हो ! मी ही संघाचा स्चयंसेवक आहे. द्वितीय वर्ष शिक्षित आहे. रामभाऊ म्हाळगी सोलापूर जिल्ह्यात प्रचारक होते. (५० च्या दशकात) तेव्हां नेहमी आमच्या गावी येत असत. त्यांनीच येथे संघाची शाखा सुरू केली..कधी सायकल वर येत तर कधी पायी पायी...  आता शाखा बंद आहे. संपर्क तुटला आहे परंतु विचार अन संस्कार टिकून अहेत.. आतापर्यंत आकाशात तरंगत असलेला मी क्षणार्धात जमिनीवर आलो. डोळे खाडकन उघडले..

नंतर जिल्हा प्रचारक झाल्यावर हाच अनुभव, असेच रामभाऊंचे नाव मी गावोगावी ऐकत राहिलो. धन्य आहे त्या काळातील प्रचारक, अप्रचारक कार्यकर्त्यांची.. ज्यानी प्रवास, निवास, भोजन यातील गैरसोयींची, कष्टांची तमा न बाळगता झोकून देऊन वर्षानुवर्षे झपाटल्यासारखे काम करत राहिले..त्या परिश्रमांवर आज संघ उभा आहे. रामभाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

1 comment:

  1. मी सुध्दा तुमच्या बरोबर बसने त्या गावात आले....अगदी त्या काळात्च गेले थोडावेळ. छानच अनुभव कथन. रामभाऊ म्हाळगींचे व्यक्तीचित्र पण वाचायला आवडेल. सध्या सगळंच बदललं आहे. तुम्हाला तर खूपच जाणवत असेल. :-)

    ReplyDelete